Wednesday, 3 July 2019

Pooja

आमच्या घरात आज लगबग होती, रेश्मा सारखी इकडून तिकडे पळत होती, दोन्ही मुली त्यांच्या कपड्यांच्या बॅग्स पॅक करत होत्या. आम्हाला सर्वाना आज मुंबई च्या जवळ एका गावी जायचं होत एका लग्नाला पूजा च्या लग्नाला. पूजा हि रेश्मा आणि माझी एक कॉमन मैत्रीण आहे जिचं उद्या लग्न होणार आहे, पूजा तशी रेश्मा ची कॉलेज पासून ची मैत्रीण, माझा खास आणि जिवाभावाचा मित्र गणेश, मी, रेश्मा, आणि पूजा एकाच कॉलेज मधून डिग्री घेत होतो. विशेष म्हणजे गणेश आणि पूजा एकाच गावात राहत असून गावात कधीच एकमेकांशी भेटले नाही ना बोलले नाहीत. गणेश पूजावर कॉलेज पासून लट्टू होता, पण गड्याने कधीच हिम्मत नाही केली, आणि आज त्या पूजा च लग्न होत, अर्थात तिला दुसरा जोडीदार भेटला होता...

रेश्मा आणि माझं लग्न ४ वर्षांपूर्वीच झालं आणि २ मुली हि झाल्या. आम्ही जॉब च्या निम्मिताने  पुण्याला राहायला होतो. त्या मुळे जॉब ला दांडी मारून लग्नाला आणि तेही खास मैत्रिणीच्या लग्नाला मुंबई ला जावंच लागणार होत.

आम्ही सर्व पॅकिंग करून गाडीत बसलो आणि निघालो, पूजाच लग्न मुंबई पासून जवळपास १ तासाच्या अंतरावर असणाऱ्या तिच्या गावी होत. आम्हाला तिथे पोहोचायला जवळपास ४-५ तास लागणार होते, आम्ही तश्या तयारीनेच निघालो होतो. पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर जवळपास लोणावळ्याच्या पुढे आल्यावर आम्ही एका हॉटेल वर थांबलो, नाश्ता आणि मुलींसाठी थोडे स्नॅक्स घेतले आणि परत प्रवासाला निघालो. सुमारे ४ वाजता आम्ही पूजाच्या गावी पोहोचलो, जरा वेळ आराम करून झाल्यावर मी रेश्मा ला  हळूच बोलावून घेतलं आणि सांगितलं कि मी गणेश कडे चाललो आहे रात्री तिथेच राहील आणि उद्या सकाळी लग्नाला येईल. तिने होकार दिल्याबरोबर झटकन काडत पाय घेतला आणि थेट गाण्याच घर गाठलं. बघतो तर काय गण्या मस्त टेरेस वर बसून दारू पीत बसला होता, विशेष म्हणजे गाण्याच्या घराचे पण सर्व जण त्यांच्या एका घराच्या लग्नाला बाहेर गावी गेले होते, म्हणून गाण्याचा मस्त प्रोग्रॅम चालू होता.

गाण्याला दारू पिताना बघून मला कळलं आजची रात्र याला समजावण्यात जाणार, म्हणून मी पण बसलो आणि एक ग्लास हातात घेऊन भाऊ च ऐकत बसलो, पूजा ने असं केलं तस केलं, बरोबर नाही केलं वगैरे वगैरे.

कसाबसा तो दारू पिऊन टूल होऊन झोपला आणि मग मी पण झोपलो, सकाळपासून गाडी चालवून थकलो होतो. सकाळी सर्व आवरून गाण्याला जातो म्हणून निसटलो,आणि चालायला लागलो, गाण्याच्या घराच्या पुढच्या बाजूला एक हॉटेल आहे, तिथे मस्त चहा मिळातो, चहा चा ग्लास हातात घेत बसलोच होतो तोच तिथे एक लहान मुलगी ५-६ वर्षांची असेल,आणि तिची आई आली आणि काहीही न मागता त्या हॉटेल वाल्याने त्या मुलीला एक बिस्किट चा पुडा आणि चहा दिला, तिने तो खाल्ला चहा पिला आणि ती चालायला लागली, मला दिसलं तिच्या मागे तिची आई पण जात होती. म्हटलं हि मुलगी रोज इथे येत असेल आणि खायला मागत असेल,म्हणून ह्या हॉटेलवाल्याने न मागताच तीळ खायला दिल,आणि मी तो विषय तिथेच सोडून लग्नाला निघालो.

लग्न लागून सर्व प्रोग्राम संपायला जवळपास ५ वाजले, आम्हाला परतीचा मार्ग पकडायचा होता, गाण्याला जाता जाता भेटून जायचं म्हणून मी गाण्याच्या घराच्या गल्लीकडे गाडी वळवली, गण्या दारू पिऊन टूल असेल काहीतरी बडबडत बसेल म्हणून रेश्मा ला म्हटलो तू आणि मुली गाडीतच बसा मी जाऊन येतो १० मिनिटात.

गाण्याला भेटलो त्याला जरा समजावलं आणि परतत होतो, चालत असताना ती सकाळची मुलगी आणि आई माझ्या पुढेच चालत होते. मी जरा धावतच होतो कारण पुण्याला परत जायचं होत.मी त्या मुलीकडे पाहिलं आणि तिच्या आई कडे बघून सांगितलं कि मुलगी फार गोड आहे, पण तिला असं भीक मागायला लावू नका,इतकी गोड मुलगी भीक मागताना चांगली नाही दिसत, तुम्ही थोडं काम शोध तुमच्या साठी,असं बोलून मी माझ्या नादात चालत राहिलो आणि समोरून एक गाडी भरधाव वेगात येताना दिसली, ती गाडी जोरात हॉर्न वाजवत होती,मी पटकन थोडा बाजूला झालो पण मुलगी आणि तिची आई काय बाजूला होईना, मी पळत जाऊन त्या मुलीला उचललं आणि आईचा हात पकडायला मागे झालो तर आई तिथे न्हवतीच.

मी आजूबाजूला पाहिलं पण आई काय दिसेना, रेश्मा सर्व गाडीत बसून बघत होती. आमची गाडी १५-२० पावलांवर पार्क केलेली होती. मी पळत तिथे गेलो आणि सर्व प्रकार रेश्मा ला सांगितला तिला हि काही कळेना काय करायचं ते. तिने त्या मुलीला विचारलं तुझी आई कुठे आहे ती काहीच बोलत न्हवती.

मग मी तसाच त्या मुलीला घेऊन त्या चहाच्या हॉटेल वर गेलो आणि त्याला सगळा प्रकार सांगितला, तो म्हटला तिची आई, नाही नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे, ह्या मुलीला मी मागच्या २ वर्षां पासून बघतो आहे हि एकटीच येते आणि चहा आणि बिस्कीट खाऊन जाते. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाहिलं असेल.

आता मात्र माझी पूर्ण तारांबळ उडाली होती. मी तसाच तिला आणि रेश्मा ला पूजाच्या घरी घेऊन गेलो, पूजा चे वडील आणि मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो, तिथे हि तेच ते सुद्धा मला तेच सांगत होते कि ते कायम त्या मुलीलाच पाहत आहेत तिच्या बरोबर कधीच कोणाला पाहिलं नाही.

मी सर्वाना एकच सांगत होतो, असं कस होईल एकदा- दोनदा ठीक आहे कि भास होईल, पण लग्नाच्या गर्दीत पण मला हीच मुलगी आणि तिची आई २-३ वेळेस दिसल्या , अर्थात त्या वेळी त्या कडे इतकं लक्ष नाही दिल.

माझं तर आता डोकंच काम करत न्हवत,पोलीस स्टेशन मधून घरी परत आल्यावर रेश्मा ने एक सल्ला दिला ती म्हणाली, आजची रात्र इथेच राहू आणि उद्या सकाळी बघू काय करायचं ते. ह्या सर्व प्रकारामध्ये त्या मुलीकडे कोणाचच लक्ष न्हवत , ती घाबरली होती आणि माझ्या कडेवरून उतरायला तयारच न्हवती. रेश्मा ने गोड बोलून आणि तिला चॉकलेट  खायला देऊन कसबस उतरवलं आणि जेवायला बसवलं, सर्व झोपी गेल्यावर मी आणि रेश्मा दोघेही बोलत होतो, तिला पण मी ते सर्व परत परत सांगत होतो कि हे शक्य नाही मी तिच्या आईला बघितलं होत एक वेळेस नाही ६-७ वेळेस आणि तेही हिच्याच बरोबर. तिचा हि तास फारसा विश्वास बसत न्हवता कारण आजूबाजूला सर्व एकाच बोलत होते,आणि तिच्या आईला पाहणारा मी एकटाच होतो. 

सकाळी मी पुन्हा त्या लग्नाच्या हॉल च्या जवळपास , चहा च्या हॉटेल च्या आजू बाजूला शोध घेतला सर्व करून थकल्यावर मी परत घरी जात असताना मला तीच बाई झाडा खाली बसलेली दिसली आणि ती माझ्या कडे बघत हसत होती, तिला बघून माझ्या जिवंत जीव आला.

मी पळत तिच्या कडे गेलो आणि तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करायला लागलो, ताई कुठे होता तुम्ही, सर्व मला खुळ्यात काढायला लागले, असं कास तुम्ही तिला सोडून गेलात, चला आणि सर्वाना सांगा कि मी खर बोलत होतो, मी एकटाच बडबडत होतो आणि ती माझ्याकडे बघून फक्त हसत होती, मला काहीतरी चुकल्या सारखं वाटलं , मी थोडा शांत झाल्यावर ती म्हटली,
भाऊ, घाबरू नका पण इथे मी फक्त तुम्हालाच दिसत आहे बाकी मला पाहू शकत नाही, मला मरून सुमारे २ वर्ष झाली. माझी मुलगी सुद्धा मला पाहू शकत नाही, हो ती माझीच मुलगी आहे, माझा नवरा मला कधीच सोडून पळून गेला होता, आणि इथे या गावात आम्ही दोघेच राहतो
मला जरा भीतीच वाटायला चालू झाली, कारण हा अनुभव फार भयानक होता, भूत वगैरे अशा गोष्टी फक्त ऐकल्या किंवा चित्रपटात पहिल्या होत्या, आज माझ्या सोबत ते घडत होत.

ती पुढे बोलायला लागली २ वर्ष झाले,कालची समोरून येणारी गाडी तीच आहे जिने मला उडवून मारलं, मी मेल्यानंतर माझ्या मुलीच काय होईल म्हणून मी कायम तिच्या बरोबर असते, तिची रक्षा करते कारण माझा जीव अडकला आहे तिच्यात.मी रोज तिच्या मागेच असते, ती जिथे जाते तिथे माझ्या कडून होईल तितकी सर्व सुरक्षा तिला देते.

रोज माझी मुलगी आणि मी ह्याच रस्त्याने जातो आणि रोज ती गाडी येते आणि मला उडवून जाते, अर्थात मी मेलेली असल्या मुळे मला काहीच फरक पडत नाही, ती गाडी पण माझ्या सारखाच एक भास आहे, काल तुम्ही मला पाहिलं आणि माझ्या सोबत बोललात, याचा अर्थ तुम्ही मला पाहू शकतात, गेल्या दोन वर्षांमध्ये माझ्या सोबत हे पहिल्यांदाच घडलं होत, आता हे तुमच्या बाबतीतच का घडलं ह्याच उत्तर माझ्याकडे नाही. कदाचित हीच देवाची इच्छा आहे.ज्या क्षणी तुम्ही माझ्या मुलीला गाडी उडवून जाईल म्हणून उचललं ते पाहून मला लगेच कळलं कि तुम्हीच माझ्या मुलीची काळजी घेऊ शकतात म्हणून मी लगेच तिथून पसार झाले.
आजवर माझ्या मुलीला इथेच कोणीच उचलून घेतलं नाही कि तिची काळजी केली नाही सर्व तिला हाकलण्याचा किंवा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही पहिली व्यक्ती आहेत जिने तिला आपल्या मुली सारखं समजून उचलून घेतलं आणि वाचवायचा प्रयत्न केला .

अर्थात मी लांबून सर्व पाहत होते,
काल तुमची होणारी तारांबळ, धावपळ पहिली म्हणून आज परत मी तुमच्या समोर आले, माझ्या मुलीला आज पासून मी तुमच्या कडे सोपवत आहे, तिची कशी काळजी घ्यायची हे मी तुम्हाला नाही सांगू शकत पण मला खात्री आहे तुम्ही तिच्या आयुष्याचं सोनंच करणार.

इतकं सगळं बोलून ती परत गायब झाली, ह्या वेळी मात्र मी तिला शोधलं नाही . मी थोडा वेळ तिथेच झाडाखाली बसलो घडलेलं सर्व मनात गिरवत होतो.

थोड्या वेळात घरी गेलो रेश्मा ला सर्व घडलेला प्रकार सांगितलं तिला तर तो विश्वासच बसत न्हवता,

शेवटी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्ही सर्व कायदेशीर कारवाया करून त्या मुलीला दत्तक घेतलं. ती आता रोज माझ्या २ मुलीं बरोबर शाळेत जाते. आणि तीच नाव आम्ही ठेवलं आहे पूजा, का कारण पूजाच खरं कारण होती ह्या प्रकाराला.

हा प्रकार आम्ही नंतर कधीच कोणाला सांगितला नाही. आम्ही सर्वाना तिची ओळख आमची मोठी मुलगी म्हणूनच करून देतो.

असो जे होत ते चांगल्या साठीच होत,त्या मुलीची आई मला अधून मधून दिसत असते, कधी आमच्या सोसायटीच्या खाली तर कधी शाळेच्या गेटवर, कायम तिच्या डोळ्यात पाणी असत  आणि  चेहेऱ्यावर स्मित हास्य!

Thursday, 9 June 2016

बायको आणि मी

आल्यावर तिचे आई बाबा माझ्याशी साधी बोलताही नाही,
आणि आले कधी माझ्या घराचे, का आले असे विचारते हि बाई

अहो अहो म्हणून थोडा आदर द्यायला लागते,
गोड गोड बोलून हि सर्व कामे तेव्हढे करून घेते

जेवणात काय करू म्हणून रोज रोज विचारते मला,
जेवण मात्र बनवते तेच जे पसंत आहे तिला

चोरून माझ्याच पाकिटातले पैसे beauty parlor ला जाऊन येते,
आणि पैशांचा हिशेब सगळा रोज माझ्याकडूनच वदवून घेते

मी काय बोलतो आहे त्याचा साधा विचार हि ती करत नाही,
भांडणा मध्ये मात्र तिचा शब्द हि खाली पडत नाही

प्रेम आहे कि होत याच,
नामोनिशान हि कुठेच दिसत नाही
तरी मात्र बायकोशिवाय आयुष्यभर पर्याय नाही

Friday, 27 September 2013

तु

तु आहेस ना त्या बरसणाऱ्या सरी प्रमाणे आहेस,
कधी जोरदार आणि टपोऱ्या  थेंबाप्रमाणे बरसणारी,
तर कधी संथ,शांत आणि मधुर बरसात  वाटणारी…

तू आहेस  ना  त्या उमललेल्या गुलाबाप्रमाणे आहेस,
चाहुबजूस काट्यांमध्ये मस्त आणि  बिनधास्त राहणारी,
तर कधी उमलून दूरवर सुगंध पसरवणारी…

तुला पाहिलं ना कि जीवन कस सुंदर सुंदर वाटत,
आल्हाद कोण्या पानावर झोपी गेल्यासारख भासत,
तू आहेसच तशी खोल समुद्रातील एखाद्या मोत्यासारखी,
आणि उंच आकाशात टीमटीमत्या ताऱ्यासारखी…

Wednesday, 27 February 2013

ति हसताना

आज तिला पाहिलं खूप दिवसानंतर मनमुराद हसताना,
हसताना तिची सारी दु:खे पचवताना,
मी चकित झालो थोडासा तिच्याकडे पाहून,
पण जरा बर वाटलं तिला हसताना पाहायला ...

काही दिवसांपासून आमची विचार वेगळे होत होते,
शब्दांना खूप विरुध्द फाटे फुटत होते,
आज मीच थोडा प्रयत्न केला सर्व विसरायचा,
नव्याने पुन्हा सुरवात करायचा,
मी चकित झालो थोडासा माझ्यातील बदलावर ,
पण जरा बर वाटलं तिला हसताना पाहायला ...

तिला काही विचारले तर ती काही बोलतच न्हवती,
मनातले खुपणे कधी सांगतच न्हवती,
काही बोलण्याआधीच तिचे डोळे खूप काही बोलून जायचे,
आज मीच थोडा प्रयत्न केला तिचे डोळे मनापासून वाचण्याचा,
मी चकित झालो तिच्या त्या भावना वाचून,
पण जरा बर वाटलं शेवटी तिला हसताना पाहायला ..

Tuesday, 11 December 2012

एकदा प्रत्येकाने...!

एकदा प्रत्येकाने तान्ह बाळ होऊन बघावे,
आईच्या त्या उबदार कुशीत पुन्हा झोपी जावे,
तेव्हा कळेल प्रत्येकाला आईच्या मनातील खंत,
नसता समोर तुम्ही तिचा तळमळणारा अंत..!

एकदा प्रत्येकाने छोटस नाजूक फुल होऊन पाहावे,
सूर्याच्या त्या लक्ख प्रकाशात वाऱ्याबरोबर डूलावे,
तेव्हा कळेल प्रत्येकाला त्याची ती कसरत एका पायावरची,
सोबती असूनही टोचून बोलण्याची सवय त्या काट्याची...!

एकदा प्रत्येकाने वाळवंटातील झाड होऊन पाहावे,
डोक्यावर रणरणत उन असून खाली उभ्याना शांत निजवावे,
तेव्हा कळेल प्रत्येकाला झाडाचा तो महिमा,
मारताना कुऱ्हाड त्यावरी होत असणाऱ्या त्या जखमा...!

रोजसारखे रोजच...!

रूममधला साबण संपून चार दिवस झाले,
१० रुपयाच कोलगेट हि आता आलंय संपत,
आळस साचलाय डोक्यात इतका कि,
जागेवरून उठायची आता होत नाही हिम्मत...!

असाच रोजच पडून असतो विचारांच्या विचारात,
झोपण्यासाठी झोप नाही,मन पळतंय स्वप्नांच्या राज्यात,
एका नंतर एक असा स्वप्नांचाही चालतोय खेळ,
मात्र मला लोळन्यास हि पुरेना झालाय वेळ...!

स्वप्नांची तर मांडणी केलीय कालच रात्री,
त्यांना पूर्णत्वास नेण्याची करून देतोय खात्री,
रोज नव्या स्वप्नांची डोक्यात असतेय रोजच दंगल,
उघडताच डोळे रोज सकाळी चाहुबजूस असते नुसत जंगल...!

त्या जंगलात आपण आहोत एक न दिसणारे जीव,
इतके सूक्ष्म असल्याची मला आली नाही कधी कीव,
ह्या जीवाची कोणास माहिती नाही नि काळजीही नाही,
कोणी मला ओळखावे अशी इच्छा हि माझी नाही...!

नेहमी सारखे रोजच मी आळश्यासारखे जगावे,
जगता जगता आळसच सोबतीस घेऊन मी मारावे,
माझी जागा रिकामी करण्याआधी देवाकडे एकाच मागणे,
दुसरा अमोल पाटील पुन्हा ह्या जगात न पाठवणे...!

Friday, 2 November 2012

दुरावा

हा दुरावा न सहन होणारा,न सांगता येणारा,
अवघड दरीतून खोलवर जाणारा,
जरा वाटेत साथ मिळताच,
मधेच अचानक वळणावर विभागणारा...!

विश्वासाचा एक पूल आहे रस्त्यात,
भावनांची साथ मिळते मध्यात,
पावला गणिक आठवतो तिचा चेहरा,
जरा हसरा नाजूक आणि लाजरा...!

ती सामावते मग दोन्ही डोळ्यात,
आणि गहिवरतात डोळे एका क्षणात,
आठवतो तो तिचा हातातील हात,
कुजबुजणे तिचे हळूच माझ्या कानात...!

का हा दुरावा असावा प्रेमात,
का हि साल उठावी उरात,
का हा त्रास सहन करावा जीवाने,
का रोज कोण दुसऱ्यासाठी तडपाव एकाने..!

मी सहन करेन हे सर्व डोळे बंद करून,
तिच्या शिवाय श्वास बंद ठेऊन,
पण ह्या त्रासात तिचे काय होणार,
हा असह्य दुरावा तिला नाही ते झेपणार...!

वाटते तिच्यासाठी सर्व बंध तोडून जावे,
तिच्या साठी तिला दूर समुद्रापार न्यावे,
तिच्या साठी रात्रीला रोखून धरावे,
आणि त्या रात्रीत तिच्यासह सुंदरसे स्वप्न पाहावे...!