Thursday, 16 August 2012

आज मीही जरा आभाळात उंच जाऊन येतो

आज मीही जरा आभाळात उंच जाऊन येतो,
उडणाऱ्या त्या पक्षांबरोबर मीही हिंडून येतो,
निळ्याक्षार त्या आभाळाला गवसणी घालून येतो,
जोरदार त्या हवेला झुंज देऊन येतो...!

पंखांमध्ये ही माझ्या आज बळ आले आहे,
उडण्या साठी तेही आता सज्ज झाले आहे,
मनाचीही जरा आज तयारी करून घेतो,
आज मीही जरा आभाळात उंच जाऊन येतो...!

उडता उडता आकाशातून पृथ्वी पाहीन म्हणतो,
विशाल त्या सागराला नजरेत समावीन म्हणतो,
जमल तर जरा क्षितिजाच्या पल्याआड फिरून येतो,
आज मीही जरा आभाळात उंच जाऊन येतो...!

आभाळा कडे डोळे माझे, आभाळास ललकारत आहेत,
जमिनीला तंग देऊन आज मी आकाशात उडत आहे,
लांब त्या चंद्रावर आज मीही पाऊल टाकून येतो,
आज मीही जरा आभाळात उंच जाऊन येतो...!